Ad will apear here
Next
श्रीगणपती अथर्वशीर्ष भावार्थसार
गणपती अथर्वशीर्ष हे अथर्ववेदातील उपनिषद आहे. अनेक जण ते नेहमी म्हणतात, त्याची आवर्तनेही करतात; मात्र त्यातील अनेक शब्दांचा अर्थ लक्षात येतोच असे नाही. म्हणूनच स्वामी माधवानंद (डॉ. माधव नगरकर) यांनी ‘श्रीगणपती अथर्वशीर्ष भावार्थसार’ या पुस्तकात गणपती अथर्वशीर्षाचे सूक्ष्म-अर्थविवरण केले आहे. कथा, नाममंत्र यांसह श्री गणेशाचे ज्ञानमय व भक्तिभावमय दर्शन त्यांनी या पुस्तकातून घडविले आहे. आज (दोन मार्च २०२१) अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. त्या निमित्ताने, त्या पुस्तकातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत.
.....
ॐ नमस्ते गणपतये। 
त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि। त्वमेव केवलं कर्ताऽसि।
त्वमेव केवलं धर्ताऽसि। त्वमेव केवलं हर्ताऽसि।
त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्माऽसि।
त्वं साक्षादात्माऽसि नित्यम्॥१॥

ॐ नमस्ते गणपतये ।

॥ॐ॥ म्हणजे परमात्मा किंवा ब्रह्म. 
जे परमतत्त्व विश्वाला आधार आहे, विश्व व्यापून आणि त्याही पलीकडे आहे, त्याचा निर्देश ॐ या एकाक्षर मंत्राने केला जातो; म्हणून ॐला ‘एकाक्षर ब्रह्म’ म्हटले जाते. 

ओंकाराने देवाचे कोणतेही रूप डोळ्यांसमोर न येता केवळ परमात्म्याची जाणीव किंवा भाव अंतरात प्रकट होतो. हा भावच उपासनेत मुख्य गोष्ट असल्याने बहुतेक उपासना आणि मंत्रांचा ॐच्या उच्चाराने प्रारंभ होतो.

ब्रह्माचे नाव?
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -
नवजात बालकाला जन्मतः काही नाव नसते; पण घरातील लोक त्याला नाव ठेवतात आणि त्या नावाने संबोधू लागतात. हळूहळू त्याला त्या नावाची इतकी सवय पडून जाते, की झोपेत असले तरीसुद्धा त्या नावाने हाक मारली तर ते ओ देत उठते. तसे, ज्या नावाने ब्रह्म ओ देते तोच ओंकार. जगाचा प्रेमळ हितकर्ता बाप म्हणजे वेद. नुसते निर्गुण-निराकार ब्रह्म म्हणून त्याचे आकलन होणार नाही, म्हणून वेदाने त्याला ॐ हे नाव दिले. ब्रह्म हे शब्दांत येत नाही, कोणत्याही वर्णनाला ते प्रतिसाद देत नाही; पण ज्या नामाने ते ओ देते तो ॐकार! या ॐ नामाने, 

ब्रह्माचा अबोला फिटावा। अद्वैतत्वे तो भेटावा।
ऐसा मंत्रु देखिला कणवा। वेदे बापे॥ (ज्ञा. १७/३३२)
या सुंदर काव्यावरून समजायचे हे, की ॐ म्हणजे ब्रह्म, परमतत्त्व वा परमात्मा. 

गणपती - गण म्हणजे समुदाय. पंचभूतांपासून निर्माण झालेल्या सर्व सृष्टीत अनेक समुदाय आहेत. या अनंत विश्वात अनंत आकाशगंगांचे समुदाय आहेत. तारका आणि ग्रह यांचे समुदाय आहेत. आपल्या सूर्यमालेतील ग्रहांच्या समुदायातील एक आपली पृथ्वी. या पृथ्वीवर अनेक डोंगर, नद्या, वनस्पती आणि प्राण्यांचे उदंड समुदाय आहेत. त्यात माणसांचेही समुदाय आहेत. माणसात अवयवांचे, इंद्रियांचे, विविध उतींचे (tissues), पेशींचे, आंतरद्रव्यांचे समुदाय, गुणसूत्रे आणि गुण (chromosomes, genes) यांचे समुदाय असतात. तसेच, मनात निर्माण होणाऱ्या विचार, भावना, कल्पना, कामना अशा नाना वृत्तींचे गण म्हणजे समुदाय असतात. या सर्व गणांना नियंत्रित करणारा जो त्यांचा अधिपती तो गणपती.

कथांच्या अनुसार गणपती हा शिवगणांचा अधिपती म्हणजेच नायक. म्हणून गणनायक हेही त्याचे एक नाव आहे. गणांचा पती म्हणजे (प्रेमाने) पालन करणारा त्यांचा ईश किंवा स्वामी. म्हणून त्याची दुसरी नावे, गणेश किंवा गणनायक ही याच अर्थाची आहेत.

ॐ म्हणजे ब्रह्म किंवा परमात्मा हे ज्याचे तत्त्वस्वरूप आहे अशा,
गणपतये 
हे गणांचा अधिपती, नायक किंवा ईश म्हणजेच स्वामी असलेल्या गणपती,

नमस्ते 
नमस्ते = (नमः+ते) तुला नमस्कार असो.

सगुण  
सगुण म्हणजे गुणांसहित असलेला ईश्वर. या ईश्वराचीच पूजा केली जाते. त्याला काही अर्पण केले जाते, त्याची भक्ती केली जाते. तसेच, तोही भक्ताला प्रतिसाद देतो, सर्वांना सांभाळतो, वाईटाचे निवारण करतो, आपल्याला उन्नत होण्यासाठी हात देतो म्हणजेच शक्ती पुरवतो, आपल्यावर वात्सल्य-प्रेम करतो. हे आणि असे अनेक गुण भक्त त्याच्यामध्ये पाहू शकतो. मुख्य म्हणजे तो आपल्या चुका पोटात घालतो, शिक्षा केलीच तर अगदी आपल्याला फार त्रास होणार नाही इतके सांभाळून शिक्षा करतो. असे समजताना आपण भक्त म्हणजे कोणी विशेष आहोत हेही मनाला सुखावते. स्वतःच्या, मुला-बाळांच्या आणि संबंधितांच्या बाबतीतल्या सर्व मागण्या, सगुण ईश्वराला केलेल्या असतात. तसेच, विविध उपासना, व्रते, पूजा-उपचार, नैवेद्य समर्पण इत्यादी सर्व उपचार, हे या सगुण ईश्वरालाच केले जातात.

सगुण-साकार 
या स्वरूपाला विशिष्ट रूप, आकार, वर्ण असतो. त्याचे एका विशिष्ट प्रकारचे ध्यान असते. कदाचित एकापेक्षा जास्तही वेगवेगळी रूपे असतात. जसे कृष्ण म्हटले, की रांगणारा बालकृष्ण, मुरलीधर श्रीकृष्ण, विश्वरूपदर्शन दाखवणारा श्रीकृष्ण अशी अनेक रूपे आहेत. तसेच गणपतीच्या बाबतीत - बालगणेश; हातांमध्ये पाश, अंकुश, दंत, परशू, मोदक घेतलेला; एकटा किंवा शारदेसहित किंवा ऋद्धी-सिद्धी बाजूला उभ्या आहेत असा; तसेच शिव-पार्वती यांच्याबरोबर असलेला गणेश - अशी गणपतीची अनेक रूपे आहेत. त्याच्या साकार ध्यानाचे वर्णन अथर्वशीर्षात, ‘एकदन्तं चतुर्हस्तम् ...’ या श्लोकात आले आहे.

हे गणपती तुला नमस्कार असो, असे म्हटल्यावर गणपतीचे कोणतेही सगुण-साकार ध्यान सहजच डोळ्यांसमोर येते.

सगुण-निराकार
नुसते ‘देव’ असे म्हटल्यावर किंवा ‘देव माझ्याबरोबर आहे’ असे म्हटल्यावर देवाचे विशिष्ट रूप मनात न येता केवळ ईश्वरभाव मनामध्ये येतो. हाच सगुण-निराकार देव. सदोदित जो देव आपल्याबरोबर असतो, तो बहुधा या स्वरूपामधलाच असतो. कोणतेही रूप मनात घेतले की हा देव सगुण-साकार होतो आणि प्रतिमांमधूनही साकार होतो. सर्व सान्त प्रतिमांमधून व्यक्त होणारा हा ईश्वर तत्त्वस्वरूपाने अनंत असतो. 

ॐ हे पद सगुण-निराकार आणि निर्गुण परमतत्त्व या दोन्हींचा निर्देश करते.

ॐ नमस्ते गणपतये यामध्ये ॐ आणि गणपतये या पदांनी निर्गुण-निराकार परमतत्त्वापासून सगुण-साकार ईश्वरापर्यंत, त्याच्या अव्यक्त आणि व्यक्त अशा पूर्ण स्वरूपाला नमन केले गेले आहे.

‘तुला नमस्कार असो’ असे म्हटल्याने मनामध्ये भक्तिभावना निर्माण होते. मन स्तवन करायला, तसेच ज्ञान ग्रहण करायलाही योग्य अशा सौम्य आणि विनम्र भावात येते. ‘तू बुद्धिदाता असल्यामुळे तू मला समजून घे व समजावून दे,’ अशी प्रार्थनाही त्यात सामावलेली आहे असे समजले पाहिजे.

नुसत्या ॐ आणि गणपती या शब्दांनी ईश्वरभाव मनात निर्माण होतो; पण ‘मी तुला नमस्कार करत आहे’ असे म्हटल्याने त्याचे अस्तित्व अत्यंत स्पष्टपणे जाणवते, एवढेच नव्हे तर अंतःकरणाचा त्याच्याशी संवाद सुरू होतो.

या संपूर्ण स्तोत्रामध्ये देवाचे स्वरूप ‘असे-असे आहे’ असे त्याचे त्रयस्थपणे वर्णन केलेले नसून, ‘तू असा-असा आहेस’ असे त्याला समोर ठेवून त्याच्याशी बोलल्यासारखे त्याचे वर्णन आहे; हे या स्तोत्राचे आगळे वैशिष्ट्य आहे. यामुळे ईश्वराच्या अस्तित्वाला भावस्पर्श करीतच हे स्तोत्र म्हटले जाते. मी म्हणतो आहे, ते तो ऐकतो आहे आणि म्हणण्यामागची भावना तो जाणत आहे, ही भावना ठेवून म्हटल्यामुळे चित्त देवात राहते, देवाबद्दल देवाशीच बोलते. बोलता-बोलता त्याचे स्वरूप जाणते आणि त्याला भावसमर्पणही करते.

पुढच्या विधानापासून गणपती या नामाने ज्याला आपण संबोधत आहोत, त्या परमात्म्याचे तत्त्वस्वरूप सांगायला प्रारंभ होत आहे.

त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि।
‘तत् त्वम् असि’ म्हणजे ‘ज्याला परमात्मतत्त्व किंवा ब्रह्मतत्त्व म्हणतात ते तू आहेस.’ तत्त्वमसि या महावाक्याने ज्या ज्ञानाचा बोध होतो, ते ज्ञानस्वरूप, हे गणपती, तू प्रत्यक्ष आहेस.

तत्त्वमसि 
‘तत्त्वमसि’ हे वेदांतील महावाक्य आहे. महावाक्य याचा अर्थ खूप मोठे वाक्य असा नसून, ज्याचा अर्थ खूप सखोल किंवा व्यापक आहे असे वाक्य. महावाक्यात परमतत्त्वाच्या स्वरूपाचे ज्ञानपूर्ण विधान असते. ‘तत्त्वमसि’ हे महावाक्य छांदोग्य उपनिषदामध्ये उद्दालक या नावाने प्रसिद्ध असलेल्या आरुणीने आपला पुत्र श्वेतकेतू याला परमात्मतत्त्वाचा बोध करताना पुनःपुन्हा उच्चारलेले आहे. उद्दालक-आरुणी म्हणतो, ‘तो जो हा अतिसूक्ष्म (अणिमा) आहे तद्रूपच हे सर्व काही (विश्व) आहे. तोच सत्य आहे, तो आत्मा आहे. श्वेतकेतू, तो तू आहेस - तत्त्वमसि श्वेतकेतो इति’- हेच आत्मज्ञान.

‘तत्त्वमसि’ या (किंवा याच स्वरूपाच्या) महावाक्याने आत्मज्ञानाचा बोध सद्गुरू शिष्यांना करीत असतात. पारमार्थिक प्रवासात हे ज्ञान होणे हीच मुक्कामाची स्थिती होय.

हे ज्ञान विचारांनी कळले तरी त्याचे चिंतन-मनन आणि निदिध्यासन यांनी ते स्वानुभूत करावे लागते.

प्रत्यक्ष = प्रति+अक्ष. अक्ष म्हणजे डोळे किंवा दृष्टी. प्रति म्हणजे विरुद्ध बाजूला किंवा समोर. एखादी गोष्ट दृष्टीसमोर आली असता, पाहून तिचे जे ज्ञान होते त्याला म्हणतात प्रत्यक्ष. एखादी वस्तू पाहता येते, तसा आत्मा हा दृष्टीने पाहण्याचा विषय नाही म्हणून त्याचे प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे अनुभवसिद्ध किंवा स्वानुभूत ज्ञान. हे गणपती, तू तत्त्वमसि या महावाक्याने निर्देशित केलेल्या ज्ञानाचे प्रत्यक्ष स्वरूपच आहेस.

हे ज्ञान विचारांनी एका टप्प्यापर्यंत कळते. त्याचा अनुभव येण्यासाठी मंत्राच्या माध्यमातून ध्यान केले असता योगस्थिती विकसित होते, बुद्धी सूक्ष्म होते आणि आत्मज्ञान ग्रहण करायला समर्थ होत जाते.

‘तत्त्वमसि’ हा विचारही एकदम लक्षात येत नाही. उद्दालक-आरुणीने या ज्ञानाचा बोध आपला मुलगा श्वेतकेतू याला अर्थातच मोठ्या आत्मीयतेने केला होता. त्यांच्यामध्ये पिता-पुत्र आणि गुरू-शिष्य ही दोन्ही नाती होती. म्हणूनच त्यांनी एकदा ‘तत्त्वमसि श्वेतकेतो इति।’ हे सांगितल्यावर श्वेतकेतू मोकळेपणाने म्हणाला ‘भगवान, मला हे कळलं नाही. परत सांगा.’ त्यावर प्रेमाने, ‘हो सांगतो हं’ असे म्हणून त्यांनी उदाहरण दिले, की ‘मधमाश्या वृक्षातून (म्हणजे त्याच्या फुलांतून) रस (म्हणजे मध) गोळा करतात, त्या वेळी त्या एकत्रित झालेल्या मधातील कणांना मी अमक्या वृक्षाचा मध आहे असे स्वतंत्र भान नसते, तसेच संपूर्ण प्रजा सत्पासून झालेली आहे- सत्स्वरूप आहे याचे प्रत्येकाला भान नसते. ते सत्स्वरूप म्हणजेच आत्मतत्त्व, ते तू आहेस; तत्त्वमसि श्वेतकेतो इति!’ हे सांगितल्यावर श्वेतकेतू म्हणाला, ‘मला कळलं नाही. पुन्हा सांगा.’ त्यावर ‘हो सांगतो’ असे मोठ्या प्रेमाने म्हणून उद्दालक-आरुणीने असेच अजून सहा दृष्टांत देऊन ती गोष्ट त्याला समजावून सांगितली, तेव्हा त्याला ते (कसेबसे) कळले.

यावरून हे स्पष्ट झाले होते, की हा विचारसुद्धा झटकन कळणारा नाही आणि त्याचे प्रत्यक्ष ज्ञान तर अतिसूक्ष्म आहे. गणपती हे या सूक्ष्म आत्मज्ञानाचे स्वरूप होय. 

(‘श्रीगणपती अथर्वशीर्ष भावार्थसार’  हे स्वामी माधवानंद यांचे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी किंवा त्याचे ई-बुक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZBRCN
Similar Posts
चैतन्यस्पर्श ‘आपण सापाला घाबरतो, त्याच्या हजारपट जास्त तो आपल्याला भितो. आणि त्या भीतीपोटी तो जी डिफेन्स मेकॅनिझम वापरतो म्हणजे फणा उगारून फुत्कारतो त्याने आपण घाबरतो. आज मुक्काम कर, तुला उद्या बापूसाहेबांना भेटवतो...’ ‘कोण बापूसाहेब? योगी वगैरे आहेत का?’ ‘छे रे, बापूसाहेब म्हणजे एक भुजंग आहे.. जुना... नव्वद वर्षे वयाचा सर्प आहे
वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज रचित श्री दत्तात्रेय स्तोत्राचे विवेचन परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांनी रचलेले श्री दत्तात्रेय स्तोत्र अद्भुत आहे आणि त्यात प्रचंड अर्थ सामावलेला आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालणारे सद्गगुरू श्री. वासुदेव वामन बापट गुरुजी यांनी या स्तोत्रातील प्रत्येक शब्दाच्या अर्थासह व्यापक विवेचन करणारे पुस्तक लिहिले आहे
स्त्रियांचे पारंपरिक खेळ स्त्रिया आणि नवनिर्मितीचा संबंध प्राचीन आहे. वेगवेगळ्या प्रसंगांची गीतं, खेळ, उखाणे यातून स्त्रियांची प्रतिभा फुलत आली आहे. सतत नावीन्याचा ध्यास असणाऱ्या स्त्रीने काळानुसार त्यात भर घातली आहे.
प्रकाशपुत्र रघू... रघुनाथ... सद्गुरू श्री शंकर महाराजांनी निवडलेला, अध्यात्मात खूप उंची गाठण्याची क्षमता असलेला एक साधक, खेड्यातला शेतकऱ्याचा मुलगा. महाराजांनी त्याला सोपवलं आपलाच शिष्य जगन्नाथ याच्याकडे. रघुनाथ आणि जगन्नाथ यांच्या आध्यात्मिक प्रवासाची आणि अनोख्या नात्याची कहाणी जगन्नाथ कुंटे यांनी ‘प्रकाशपुत्र’ या पुस्तकातून मांडली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language